ऐक्यभाव
एक नदी पहाडावरुन खळखळत खाली उतरली. त्यावेळी त्या पहाडावरचे एक रोपटे त्या नदीला हसते आणि म्हणते, बाई, तू आकाशाकडे जाण्याऐवजी या जमिनीकडे कशासाठी जातेस? तेव्हा ती नदी खळाळत हसून म्हणते, मी माझ्या सागरपणाकडे जाते आहे! आणि हे रोपट्या तू आकाशाकडे का पाहतोस? रोपटे म्हणाले, मला उंच व्हायचे आहे. मोठे व्हायचे आहे. तुझ्यासारखे एखाद्या सागरात मिळून जायचे नाही. स्वतःचे अस्तेपण मला गमवायचे नाही. मी हळूहळू वाढेन, उंच होईन, या शिखरावरचा वृक्ष असल्याने मी या शिखराहूनही उंच होईन. तरीही मी वाढेन, उंच उंच आकाशाकडे जाऊन या जगाकडे पाहेन. मग सर्व जग निव्वळच ठेंगणे असेल आणि मी एक महान वृक्ष असेल. आकाशासारखा मी सर्वांहून उंच आणि सर्वांपेक्षा अलिप्त असा होईन. त्या सरितेने आपल्या आसवांचे दोन तुषार त्या रोपट्यावर शिंपडून ती अंतर्मुख होऊन आपल्याच नादात गुणगुणू लागली. ‘‘जा माझे अस्तेपण लोपून, नामरुपी घट्ट तू नामरुप हो‘‘. माझे दोन किना-यांनी बांधले गेलेले हे नदीरुपही शिल्लक न राहो आणि नदी हे नावही शिल्लक न राहो. मी माझ्या या जळासकट माझ्या सागरस्वरुपाशी एकरुप असो. सागरपणानेच मी अखंड असो आणि खरेच आहे. केव्हातरी ते शिखर ढासळेल किंवा तो वृक्ष तरी जुनाट होऊन खाली पडेल. खाली दरीमध्ये पडल्यानंतर अखेर तो वृक्ष जगाच्याही खाली जाईल, पार मातीमध्ये मिळून जाईल. ही नदी त्या कालीही सागरपणानेच आपले नामसंकिर्तन करीत असेल.
Comments
Post a Comment