जाणिव
सद्विचारांचा प्रभाव आपल्यावर असा पडतो की त्यामुळे आपण विचारांचे खरोखरच अत्युच्च शिखर गाठतो. सद्विचारांनी आपण फार फार उंच होतो. आपली ही उंची म्हणजे आपली स्वाभाविक स्वस्वरुप स्थिती नव्हे. तो आपल्याच पोटी निर्माण झालेला विचारांचा अभिमान असतो. त्याला विचारांचा किंवा ज्ञानाचा अभिमान असे म्हटल्या जात असते. आपल्या ब्रम्हपणाची जाणिव हेच त्याचे अत्युच्च शिखर असते. या जाणिवेचे प्रकाशक तुम्ही असता. ही जाणिव, ही ब्रम्हपणाची जाणिव, हे प्रकाशित करणारे ते तुम्ही असता. ही जाणिव म्हणजे तुम्ही नव्हे. म्हणून तुमच्या ठिकाणी प्रगट असणारी ‘मी ब्रम्ह आहे‘ ही जाणिव, त्या जाणिवेलाही प्रकाशित करणारे ते तुम्ही असता. ही जाणिव तुम्ही प्रकट केली. ही जाणिव तुम्हीच तुमच्यामधे लय करुन टाकणारे आहात.
अशारितीने तुम्ही या जाणिवेचे सर्व समर्थ असे जनक आहात. तुम्ही ब्रम्हस्वरुप झालात. महतो महिमान असे महानाहूनही महान असे झालात. ईश्वर, देवदेवता, सर्व प्राणीमात्र खालीच राहिले. खुजेच ठरले तरी या ठिकाणी ती उच्चता तुम्हाला पचवता आली नाही, स्वतःमध्ये जिरवून टाकता आली नाही. म्हणून हे उच्चतेचे एक अजिर्णच तुम्हाला झालेले असते. त्यातूनच तुम्ही ज्ञानाचे बोलण्याचे खौट ढेकर देत असता.
Comments
Post a Comment