अभंग स्वरूप
एकदा तुम्ही जगाला पाहत असता आणि लगेच आपल्या उंचीला पाहत असता. दोहोंमध्ये तुम्हाला भेद दिसतो. या जगाचे अंतरंग स्वरुप तुम्ही झालाच नाही, म्हणून तुम्हाला तुमची उंची ही जाणवते आहे. या उंचीची जाणिव मिळवून घ्या आणि त्या अंतरात्म्याशी, त्या जगद्अंतराशी, त्या स्वरुपाशी अभंग एकतेचा आनंद तुम्ही शिल्लक राहू देवू नका. तो ही आपल्या ठाई तुम्ही मिळवून घ्या. त्या निर्विकल्प स्थितीमध्ये नाही उंचपणा, नाही ठेंगूपणा, नाही जग, नाही जगामध्ये उंच असणारी एखादी व्यक्ती. त्या ठिकाणी कोणताही संकल्प-विकल्प नाही. अशी ती निर्विकल्प स्थिती आपली आपल्याच ठिकाणी जेव्हा ब्रम्हपणाने स्फुरते तेव्हा तुमच्यासकट सर्व विश्र्वाचे नामरुप नाहिसे होते. त्या नामरुपाच्या आतमध्ये दडलेले तुमचे स्वस्वरुप हेच तुमचे विश्व होऊन गेलेले असते. हाच चैतन्याचा विलास होय.
त्याकाली जग हे जग न वाटता ब्रम्हरुपाने चैतन्याचा विलास म्हणूनच आणि त्याच्याशी आपली स्वाभाविक एकता राहूनच आपल्याला प्रगट असते. या ठिकाणी तुम्ही पाहणारे नाही आणि तुम्ही ज्याला पाहता अशी एखादी दृष्य वस्तुसुद्धाशिल्लक राहिलेली नाही. दृष्य आणि ते पाहणारा देखणा, या देखण्याचा देखणेपणा तो सुद्धा आटून जाऊन या ठिकाणी सर्वांगी एकच एक डोळसरुप प्रगटलेले आहे. सर्वांगीच त्याचे डोळे द्रष्टेपणाने आंत बाहेर सर्वत्र द्रष्ट्यालाच जेथे पाहतो तेथे त्याला द्रष्टा तरी कसे म्हणता येईल? या ठिकाणी पाहणे तरी कोठले? दृष्य आणि द्रष्टा दोन्ही बाजूला सारुन घडणारे हे अखंड दर्शन होय. असे दर्शन ज्या ठाई घडते त्या ठिकाणी तू म्हणून कोणी शिल्लक नाही. मी असे म्हणणारा कोणी शिल्लक नाही. तो असे तिऱ्हाइतपणाने दाखविणारे त्याचे तिऱ्हाइतपण गेले. ते तुमच्याशी एकरुपतेने आहे.
Comments
Post a Comment