विचारांची उंची
येथे आहे मी हा कोण? याचा करावा विचार असे ते म्हणतात. सद्गुरू आपल्याला विचार करा असे म्हणतात. ध्यान-धारणा करा, पूजा-अर्चा करा, भक्ती-भजन करा, तिर्थयात्रा, व्रत, उपवास करा असे ते म्हणत नाहीत. तर विचार करा असेच ते म्हणतात. म्हणजे विचाराने आपली आपल्याला ओळख करुन घ्या. आपले रुप आपण आरशामध्ये पाहतो. आपण काळे का गोरे, नकटे का चांगल्या नाकाचे हे आपण आरशामध्ये पाहून आपल्याला उमगतो. नंतर मग तो आरसा आपण बाजूला ठेवून देतो. त्याप्रमाणे विचाराने तुम्ही स्वतःला ओळखा नंतर तो विचार आरशाप्रमाणे बाजूला करता येत नाही तर स्वतः मध्येच मिळवून घ्या.
खलील जिब्रानला आपल्या भटकंतीमध्ये एक भटका भेटला. तो प्रवासी खूपच उंच होता, त्या भटक्याला वाटायचे की या जगातील सर्व प्राणिमात्र फार फार खुजे आहेत आणि मी फार फार उंच आहे. हे माझ्या कमरेपर्यंतही येऊ शकत नाहीत एवढे ते खुजे आहेतदिवसेंदिवस तो अधिकच उंच झाला. सर्व वृक्षादिकसुद्धा त्याच्यापेक्षा ठेंगणे ठरले. त्याहूनही तो अधिक उंच झाला. मेघादिकही त्याच्यापेक्षा खालीच राहिले. माझी तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही असे उंच होऊ नका, तसेच खुजेसुद्धा राहू नका. तुम्ही काहीच होऊ नका. ना उंच, ना खुजे. उच्च विचारांनी भरलेल्या ग्रंथांच्या, व्यक्तीच्या सहवासात राहतात आणि विषेशतः श्री सद्गुरुंच्या सहवासात आपण विचारांचे अत्युच्च शिखर गाठतो. विचारांच्या अत्युच्च शिखरावर आरुढ होतो. आपल्या इतके उंच त्यावेळी कोणीच नसते. सर्व जग आपल्याला खुजे वाटत असते. आकाशालासुद्धा आपण आपल्या पोटामध्ये सामावून घेतलेले असते. सत्य, वैकुंठ, कैलास आदि लोक सुद्धा आपण आपल्यामध्ये सामावून घेतलेले असतात. या सृष्टीमध्ये यच्चयावत असे जे काही आहे, त्या सर्वांना आपण आपल्या महान उंचीवरुन पाहत असतो. आपल्यामध्ये त्या सर्वांना सामावून घेतलेले असते. असे महान आपण झालेलो असतो. अशा या महानतेचा अभिमान सुद्धा नको असे या ठिकाणी जिब्रान सुचवित आहे.
👌👌
ReplyDelete