अभिमान


कुणी वैराग्याचा, कुणी भक्तीचा, कुणी ज्ञानाचा अभिमान धरतो. कुणी योगमार्गाचा, कुणी भक्तपणाचा, नानात-हेचे अभिमान नाना लोक धारण करतात. ते जो आनंद त्यातून लुटत असतात तो त्यांच्या अभिमानाचा आनंद असतो. तो त्यांच्या ख-या स्थितीचा आनंद नसतो. कीर्तन करत असताना, कीर्तन ऐकत असताना जो आनंद प्रगटत असतो तो त्या कीर्तनाच्या स्थितीचा आनंद असतो. आत्मस्थितीच्या ठिकाणी तो नाही. तो आत्मस्थितीचा आनंद या सर्व आनंदाचे माहेरघर आहे. शब्द ऐकण्याची जरुर नाही. बोलण्याची जरुर नाही. कोणता स्पर्श घडण्याची जरुर नाही. कोणता रस चाखण्याची गरज नाही. कोणते रुप पाहण्याची गरज नाही. रुप लावण्य दाखवण्याची गरज नाही कोणत्या गंधाची सुद्धा त्याला गरज नाही. असा शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यांची अपेक्षा न करता जो आनंद आपल्या अंतरी अखंड स्थित आहे, असा तो आनंद आहे. तो आनंद या कीर्तनावाचून, भजनावाचून, श्रवणभक्तीवाचून अंगचाच आहे. त्यासाठी आपल्याला योगाभ्यासाची गरज नाही. प्राण ब्रम्हांडाला नेण्याची गरज नाही. कारण तो आनंद ही एक आपली स्वाभाविक स्थिती आहे. तो प्राप्त करायची गरज नाही कारण आपणच आनंदरुप आहोत. 


आपण आनंदरुप कसे आहोत हे सद्गुरुंपासून समजून घ्या. तुम्ही स्वतःच्या मनाने स्वतःचा विचार करु नका आणि त्याचा अभिमानही धरु नका. तुम्ही जे ऐकत आहात त्या ऐकण्याचा अभिमान तुमच्या ठाई नसो. जो बोलणारा आहे त्याच्या ठाईसुद्धा हा अभिमान नको. त्यातून जे काही ज्ञान वगैरे प्रगटत असेल त्या ज्ञानाचा अभिमान दोन्ही ठाई नसो. त्या स्थितीत बोलणारा नाही आणि ऐकणाराही नाही. त्या स्थितीमध्ये ज्ञान वा अज्ञान नसते. अशी ती स्थिती आपल्या ठाई प्रगटत असो. ती प्रगट असते परंतु तिची ओळख आपल्याला नसते. तेवढी ओळख मात्र आपल्याला करुन घ्यायची असते. त्यालाच ब्रम्हज्ञान असे म्हटलेले आहे.

Comments

Popular posts from this blog