विभक्त भक्ती
हे भक्ता, हे टिळे-माळे तू कशासाठी लावले आहेस? तू कुणाची यात्रा करुन राहिला आहेस?
तू कुणाची भक्ती करुन राहिला आहेस? कुणाचे भजन करतो आहेस? कुणाची ओढ तुला लागली आहे?
स्वतःकडे तू कधी पाहशील? स्वतःची ओढ तुला कधी लागेल? स्वतःची भक्ती तू कधी करशील?
जर स्वतःची भक्ती तुझ्याकडून घडेल तरच त्या परमेश्वराची भक्ती तुझ्याकडून घडेल कारण तो परमेश्वर तूच आहेस. या सृष्टीमध्ये जी जी नाना योनींची अनेक रुपे आहेत त्या नाना रुपांच्या ठिकाणी असलेला अंतरात्मा तो तू स्वतःच आहेस. तुझे दैवत विठोबा, त्याचा अंतरात्मासुद्धा तू स्वतःच आहेस. हा अनुभव म्हणजे भक्ती होय. त्या सर्वांच्या अंतरात्म्याशी एकरुप असण्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव म्हणजे त्यांच्याशी विभक्तपण नसणे आणि हीच आहे भक्ती!
त्यांच्याशी विलग राहून, दूर राहून, त्यांच्याशी एकरुप न होता, त्या अंतरात्म्याशी मग तो देवाचे असोत, परमेश्वराचे असोत का कोणाचेही असोत; त्यांच्या अंतरात्म्याशी एकरुप होणे हे अपरिहार्य आहे. जर तू तुला एकरुप झालास तरच भक्ती म्हणजे ऐक्य घडेल. हे घडण्यासाठी तू काय करुन राहिलेला आहेस? हा गंध, टिळे लावणे, माळा घालणे, या तीर्थयात्रा करणे; हा जो या सर्व गोष्टींचा अभिमान, म्हणजेच तुझ्या भक्तीचा आनंद, हा जो आनंद आहे, हा आनंद म्हणजे ही एक भरारीच आहे. यामध्ये विश्राम नाही. अखेर विश्राम पावण्यासाठी हा श्रममार्ग सोडून तुला स्वतःच्याच ठाई शांतपणे पहुडावे लागेल.
Comments
Post a Comment