ओळख
अरे पाण्या, तुला कसली तहान लागलेली आहे? तुला पिऊन सर्व सृष्टी तृप्त होते. तुला कसली तहान लागलेली आहे? कशासाठी तू हे जप-तप, यज्ञ-यागादी करतोस? शरीराला, मनाला कशासाठी तू जाळून राहिलेला आहेस? कुणाची भक्ती तुला मिळवायची आहे? कुणाचे ज्ञान तुला प्राप्त करायचे आहे? कुणावर तुला प्रेम करायचे आहे? बाबारे, हा तुझा ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, तपमार्ग, कर्ममार्ग हा तुझा द्वैत मार्ग म्हणजे खरोखर भ्रममार्ग आहे. श्रममार्ग आहे. यातून भ्रम आणि श्रमच प्राप्त होणार. यांत विश्रांती नाही. म्हणून या सर्व मार्गापासून विश्राम पाव.
बाबारे, तो तुझ्या घरातच स्वतः आहे. इतर घरी जाण्याचा काही प्रश्नच नाही. कशाला घरातल्या घरात सारखा फिरतो आहेस? डोळे मिटून तू कोणत्या देवांचे ध्यान करीत आहे? डोळे उघडून स्वतःकडे पहा, त्या देवांचाही देव तू स्वतःच आहेस. हे चैतन्यमय महाप्रभू, तू कोणत्या मार्गाचा उपदेश करतोस? कोणावर प्रेम करायला सांगतोस? ज्याच्यावर प्रेम करायची तू शिकवण देतो तो श्रीकृष्ण परमात्मा तू स्वतःच आहे. जरा पहा, तू परमेश्वरावर प्रेम करण्याची गोष्ट करतो, स्वतःवर प्रेम कधी करशील? ज्याला स्वतःवर प्रेम करता येईल त्यालाच जगावर प्रेम करता येईल. मग त्याने खुशाल एखाद्या परमात्म्यावर प्रेम करावे. ज्याला स्वतःचेच स्वरुप ओळखता आले नाही तो इतरांचा अंतरात्मा कधी होणार? त्या परमेश्वराचाही आत्माराम तो स्वतःच कधी होणार? आणि मग त्याला खरे प्रेम कसे लाभणार? कारण सर्वांच्या अंतराचे तुम्ही स्वामी व्हा! सर्वांच्या अंतरात तुम्ही वास करणारे व्हा. म्हणजेच तुम्ही स्वतःवर प्रेम करु शकाल. एकदेशीपणातून प्रेमाची उत्पत्ती होणार नाही. प्रेमासाठी सर्वव्यापकत्वच पाहिजे असते आणि हा प्रेमाचा उद्वेग ही एक लहर आहे. हे महासागरा ती तू स्वतःमध्येच सहज सामावून घेतो.
Comments
Post a Comment