बावनकशी सोनं
अरे परमहंसा, एका ठिकाणी बसण्यासाठी तुला काही श्रम करावे लागतात काय? पंखाच्या भरा-या सुटल्या, पंख आपल्यामध्ये लपेटून घेतले. आता विश्राम प्राप्त करुन घेण्यासाठी तुला काही खटपट करावी लागते काय? स्वाभाविकरितीने भरारी सोडून दिले आणि तू एका ठिकाणी बसलास.
त्याबरोबर स्वाभाविक असा विसावा तुझ्या ठिकाणी आहेच की! तो कां प्राप्त करुन घ्यावा लागतो?
नाही! तो अंगचाच आहे. त्याप्रमाणे ही ब्रम्हस्थिती मूळचीच आहे. ती प्राप्त करुन घ्यावी लागत नाही. प्राप्त करुन घेण्यासाठी काही उठाठेव करावी लागत नाही. उलट उठाठेव सोडणे हेच येथे महत्वाचे आहे. त्यामुळे ध्यानाने ते प्राप्त करणे किंवा ज्ञानाने ते मिळविणे किंवा भक्तीने ती प्राप्त करणे किंवा स्वतःला आत्मा समजून तिच्यापर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत धावण्याची कल्पना करणे किंवा तो प्रेमास्पद आहे त्याच्यावर मी प्रेम केले पाहीजे, त्याने परमात्म्यावर प्रेम केले पाहिजे याची या ठिकाणी गरज नाही. काहीही करण्याची गरज नाही. असे तुम्ही आहात. तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्याची काही जरुरत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी पहिल्यापासून आहातच. पैलतीरावर तुम्ही उभे आहात. आता त्या पैलतिरावर जाण्याची काही गरज तुम्हाला आहे काय? आधीचेच तुम्ही त्या ठिकाणी आहात. त्याप्रमाणे तुम्हाला साधनांचीसुद्धा काही गरज नाही. जो आधीचाच शांत आणि गाढ झोपलेला आहे. त्याला शांत आणि गाढ झोपण्यासाठी खटपट करण्याची गरजच काय? बावनकशी सोन्याला बावनकशी होण्यासाठी अग्नीत जाळून घेण्याची काय गरज? राजाला राजेपण प्राप्त करुन घेण्याची काय गरज? तो आधीचाच राजा आहे. सर्व सृष्टीचे मूळ विश्रामस्थान ते तुम्ही स्वतःच आहात. तुम्हाला अधिक कोणत्या विश्रामस्थळी जायचे आहे?
Comments
Post a Comment