विश्रांती

       विसावा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आपल्या पंखाची फडफड तेवढी थांबवावी लागेल! म्हणून या सर्व ज्ञानाच्या, भावभावनांच्या, कल्पनांच्या, फडफडी तुम्ही थांबवल्या म्हणजे तुम्ही स्वतःच विश्रामस्थळ आहात. हे सर्व विचारसुद्धा तुमच्या शरीरामध्ये सामावले जातात. त्या स्थितीमध्ये सुद्धा यांना जागा नाही. म्हणून हीच खरी तुमची अखंड स्थिती. तुमचे पठण, श्रवण, मनन, ध्यान-धारणा, भजन-पूजन, तीर्थयात्रा, गमनागमन, नानात-हेचे जे व्यवहार आहेत; ते या भरा-यांसारखे आहेत. तुम्हाला अखेर यात शिणच येणार.

     याचा परीणाम म्हणून अखेर थकणे अपरिहार्य आहे. तुमच्या नामसंकिर्णतेचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान, बहुश्रृततेचा अभिमान, आचार विचारांचा अभिमान, व्रत उपासनादिकांचा अभिमान, तपसाधनेचा अभिमान, योग तप इत्यादिंचा अभिमान, हा अभिमान अखेर श्रमरुपच ठरतो. यामध्ये विश्राम नाही. यामध्ये तो निर्विकल्प स्थितीचा सहज असा विसावा नाही. त्यासाठी अखेर या भरा-या, या मनाच्या भरा-या शांतच झाल्या पाहिजेत. जेव्हा हे भरारणे थांबणार तेव्हाच त्या शांत होतील . ते थांबवणे तुमच्याच हातामध्ये असते. नाही तर एक दिवस अखेर काळ येतो आणि या शरीराच्या सर्व हालचालीच थांबवून टाकतो. त्याआधीच तुम्ही या मनाच्या भरा-या थांबवा व त्या मनाला आपल्यामध्ये समेटून घ्या.

      तुमच्या ठाई उत्पन्न होणारे हे मन आधी भरारी मारते, अंतर्मनाने पहिली भरारी मारते मग हे बाहेरचे पंख भरा-या घेवू लागतात. म्हणून त्या मनाला तुम्ही आपल्यात मिळवा. त्यामागे जावू नका. त्याला आपल्यात मिळवा म्हणजे हे सर्व विचार, आचार, विकार, भावभावना, वृत्तींचा कल्लोळ, तुमच्यामध्येच लय पावेल आणि तुम्ही सर्व विश्वाचे विश्रामधाम व्हाल. सत्य, वैकुंठ, कैलास इत्यादि सर्व भुवनांना तुमच्या स्वस्थितीच्या ठिकाणी विश्रांती लाभो. या सृष्टीतील यच्चयावत परमेश्वरापासून ते मुंगीपर्यंत जे जे काही आहे, ते तुमच्या स्वतःच्या स्थितीमध्ये येऊन विश्राम पावत असतात.

ती स्थिती ही तुमची खरी स्वस्थिती आहे. ती तुम्हाला कधी परकी नाही. ती तुम्हाला कधी दुसरी नाही. तुम्ही आणि ती स्थिती यांच्यामध्ये अविभाज्य स्थिती आहे. एकमेकांपासून तुम्ही वेगळे होऊच शकत नाही. कारण ती आणि तुम्ही एक आहात. म्हणून आत्मस्थिती ही तुमची स्वतःची सहज आणि स्वाभाविक स्थिती आहे. तिच्यामध्ये कृत्रीमता नाही म्हणून ती मिळवावी लागत नाही. तर ती तुमच्या ठिकाणी पूर्वीपासूनच आहे.

Comments

Popular posts from this blog