ज्ञानपंख

     अरे राजहंसा, हे विचारांचे, भावभावनांचे पंख तुला आहेत आणि त्यातून ज्ञान आणि भक्तीच्या भरा-या तू मारुन राहिलेला आहेस. या पंखांनी तू गगनाला गवसणी घालशील पण तुला स्वतःपर्यंत येण्यासाठी या पंखांची काही गरज आहे काय? एक भावपंख आणि दुसरा एक ज्ञानपंख उभारुन तू या आकाशात भरा-या मारुन राहिला आहेस. त्यामुळे दमून भागून अखेर तू काय मिळवतो? भरा-या मारुन दमला भागलास, थकलास की अखेर आपल्याच जागेवर येऊन बसतोस आणि आपले पंख आपल्याच शरीरात समेटून घेतो. तेव्हा तुला खरीखुरी विश्रांती मिळते. या पंखांना जेव्हा तू स्वतःतच आवरुन मिटवून घेतो, तेव्हाच खराखुरा तू विश्राम पावतो. जसा भरा-या मारण्याचा आनंद आहे तसा हा ज्ञानाचा, भक्तीचा, भावकल्लोळाचा आनंद आहे. पण या आनंदापेक्षा स्वतःच्या ठाईच असा हा शांत विश्रामभाव आहे की, ज्यामध्ये ते आनंद सुद्धा लय पावून जात असतात.

     अशी ही आपली स्वतःची अखंड आत्मस्थिती आहे. या विचारांच्या, भावभावनांच्या भरा-यांनी आपण स्वतःला आकाशात कां झोकून देतो? जसे जसे हे पंख तुम्ही वेगाने हलवाल तसे तसे तुम्ही आकाशात भरकटत जाणार. पण त्या आकाशाला अंत नाही. त्या आकाशाचा किनारा या पंखांनी गाठता येण्यासारखा नाही. परंतु हे लक्षात ठेवा की हे आकाश तुमच्या पोटामध्ये आहे. ते आकाशस्वरुप तुम्ही स्वतःच आहात. त्यामध्येच हे पंख मिटवून घ्या. तुम्ही स्वतःच्याच ठाई विश्राम घ्या. भरा-या मारण्याची तुम्हाला गरजच नाही.एकीकडे भरा-यांचा आनंद आणि दुसरीकडे थकल्याची ग्लानी या दोन्ही अवस्था या उड्डाणात आहेत. म्हणून यांच्या पलीकडील विश्राम म्हणजे तुम्ही पंख मिटवून बसले आहात. विश्रामस्थळ तुम्हीच आहात. तुम्हीच तुम्हाला विसावयाचे आहे. फक्त भरारणे तेवढे सोडा की झाले!

Comments

Popular posts from this blog