आत्मस्वरूप
स्थिती
तुम्ही जसे जसे बोलाल तीच खरी श्रुती आहे. कारण तुम्ही सत्स्वरुपाच्या
ठिकाणी स्थित आहात. ज्याला परमेश्वर म्हणतात, त्या परमेश्वराची मूळस्थिती म्हणजे
तुम्ही स्वतः आहात. तुमच्या पोटीच
एका ठिकाणी तुम्ही परमेश्वराचा भाव धारण केला आणि तुम्हीच एका ठिकाणी जीवपणाचा भाव धारण केला. ही सोंगे घेणारे ते
तुम्ही आहात. तुम्हीच एका ठिकाणी जीवपण, शीवपण, परमेश्वरपण या तिघांनाही आधारभूत
असणारी, अढळ असणारी स्थिती तुम्ही स्वतःच आहात. सत्स्वरुपाच्या ठिकाणी स्थिर असणे
म्हणजे स्थिती, तीच ब्रम्हस्थिती, तीच आत्मस्थिती, तीच पराभक्ती होय. सर्वांच्या पलीकडची, सत्स्वरुपाच्या ठिकाणची, जी सहजरितीने विचारांच्या पलीकडील, वृत्तींच्या पलीकडील अशी स्वाभाविक स्थिती म्हणजेच
परमस्थिती होय. तिच्याच पाठीमागल्या नंतरच्या आभासस्वरुप असणा-या या बाकीच्या चराचर विश्व आणि विश्व
प्रतिपालक म्हणून जे काही आहेत, त्या
सर्वांच्या अवस्था होत. या अवस्था आणि ती ब्रम्हस्थिती होय. आत्मस्थिती होय.
स्थिती आणि अवस्था यातला फरक ओळखा. आपल्याच ठायी
स्थित असणे ही स्थिती होय. आपलाच विसर पडून मग जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तूर्या, उन्मनी असा नानात-हेचा
भास आपल्यावरच होत असतो. हे वर्म आपण
आपल्या ठिकाणी आपणच प्रकाशित करुन आपल्यामध्ये तो अनुभवसुद्धा मिळवून घ्यावा. हे
जे विचार ऐकणे, बोलणे करीत आहात या विचारांच्या आहारी
तुम्ही जाल, या विचारांचे गुलाम तुम्ही व्हाल, तर निश्चितच त्या स्थितीची तुम्हाला ओळख नाही; की जिच्यामध्ये हे सर्व लय पावते.
काहीही शिल्लक राहत नाही. जो त्या सर्वांना
आपल्यामध्ये मिळवून बसला,
त्याची ती अखंड स्थिती आहे. तो या विचारांच्या, भावनांच्या, कल्पनांच्या आहारी गेला व
स्वस्थितीपासून ढळला आहे यात संशयच नाही.
म्हणून या विचारांचे, ते ज्ञानाचे विचार का असेनात, ते आत्मज्ञानाचे विचार का असेनात, त्यांचे तुम्ही गुलाम होऊ नका. त्यांच्या
पलिकडे असणारे तुम्ही अखंड स्वतःच्याच ठिकाणी स्थिर राहा. तुमच्या ठाई हे निर्माण झाले, होऊ देत!
Comments
Post a Comment