आत्मस्वरूप
ज्ञानस्वरुप
ज्ञान व ज्ञानाचा विचार हे सर्वस्व नव्हे. ही
एक पायरी आहे, की ज्याद्वारे आपल्याला स्वस्थळी जाता येते. ज्ञान हा एक मार्ग आहे. या
मार्गावरुन चालत आपल्याला इप्सित स्थळी पोहचायचे असते. म्हणून या ज्ञानाचा अभिमान आपल्या ठायी
नसो. ही पायरी सुद्धा पायरीच्याच जागी पडून राहणार आहे. हे ज्ञानसुद्धा त्या ज्ञानाच्याच
जागी पडून राहणार आहे. आपल्या ठायी ते नाहीत. या विचारांना, या ज्ञानाच्या विचारांना प्रकाशित
करणारे, दाखवून देणारे, ते आपण स्वतःच आहोत. हे ज्ञान म्हणजे आपण नव्हेत, पण या ज्ञानाचेही मूळस्वरुप असे
ज्ञानस्वरुप आपण आहोत. या विचारांचेही मूळस्वरुप आपण आहोत.
आत्मस्वरुपाचा विचार म्हणजे आत्मस्वरुप नव्हे.
ज्ञान म्हणजे ज्ञानस्वरुप नव्हे. ज्ञानस्वरुप
तर तुम्ही आहात. हे ज्ञान तुमच्याच ठिकाणी प्रकटते आहे. यांना प्रकट करणारे तुम्ही आहात. हे ज्ञान जसे प्रकट होते तसेच ते
तुमच्याच ठाई लय पावते. असे ते ज्ञानस्वरूप तुम्ही आहात हे ज्ञान म्हणजे तुम्ही नव्हे. म्हणून
याचे गुलाम होऊ नका. याचा अभिमान व्यर्थ आहे, याचा
अभिमान तुम्ही स्वतःमध्येच लय करा. याच्या
आहारी जाऊ नका, तर ज्ञान हे तुमच्या ओठावर नाचले
पाहिजे. तुम्ही याच्या तालावर नाचू नका. स्वतःच्या
स्वस्वरुपाच्या ठिकाणी स्थित असताना तुम्ही जे बोलाल ते ज्ञान आहे. तुम्ही जे बोलाल तीच वेद
आणि श्रुती आहेत, तीच उपनिषदे आहेत. तुम्ही जे जे उपदेशाल तो तो धर्म आहे. यांना आधारभूत
तुम्ही आहात. ते म्हणजे तुम्ही नव्हेत. या वेदांचे,
उपनिषदांचे, पुराणांचे, नाना अवतारांतील लिलांचे जनक ते तुम्ही
आहात. हे म्हणजे तुम्ही नव्हेत.
Comments
Post a Comment