आत्मस्वरूप

मी


     अरे, तू स्वतःला ओळख. स्वतःला ओळखशील तर मला ओळखशील. कारण तू आणि मी वेगवेगळे नाहीत. तू स्वतः म्हणून असा काही नाहीच. तू स्वतः म्हणजे मीच एकटा एक. तुझ्या ठिकाणी तूम्हणून मीच आहे. या लाटेच्या कणांकणांमध्ये जलरुप म्हणून मीच आहे. मी महासागरच या लाटांच्या रुपाने सर्वत्र प्रगट आहे. म्हणून तू स्वतःचे नामरुपपण बाजूला सारुन स्वतःचे जलरुप ओळख. तू स्वतःचा अभिमान, ज्ञान-अज्ञान, स्वभाव, व्यक्तिमत्व, स्वतः जे जे काही म्हणून बनला असशील ते सर्व काही सोडून दे. म्हणजे मग जो राहील तो एकटा एक मीच राहील. कारण या सर्वांसकट तू स्वतःच्या ठिकाणी मीम्हणून जी कल्पना करतोस, ते तुझे व्यक्तिमत्व हेच मुळात खोटे आहे. भासमान आहे. ते खरोखरीचे नाही. आकाशाच्या ठायी जसा निलिमा म्हणून वसतो, तो जसा आभास आहे, तसा माझ्या ठिकाणी हा जो तूम्हणून आहे तो म्हणजे निव्वळ आभासच आहे.
     एकटा एक मीच आहे. म्हणजे तूम्हणून काहीच नाही. एकटा एक मीच आहे. मी सर्वत्र आहे. मीच सर्वांच्या अंतरात प्रगट आहे. मीच सर्वव्यापी असा आहे. माझ्यावरच हा जीवपणाचा, व्यक्तिमत्वांचा, अनेकपणाचा आभास प्रगटलेला आहे. तू म्हणून काही नव्हे, तुझे तूपण हे आभासमय असल्यामुळे तुला खरोखर माझ्यापेक्षा वेगळे असे अस्तित्वच नाही. माझ्या अस्तित्वाने तुझे अस्तित्व भासते. हे लहरी! मी आहे म्हणूनच तुझे अस्तित्व आहे. म्हणून या लहरीपणाचा अभिमान व्यर्थ आहे. तो अभिमान तू सोडून देऊन मला शरण ये. म्हणजे माझ्याशी तुझी स्वाभाविक एकरुपता कशी आहे हे तू स्वतः ओळख. तुझे हे मिथ्यारुप झुगारुन दे! जे तुझ्या ठिकाणी नानात-हेचे विचार, भावभावना, कल्पना, विकारवासना यांनासुद्धा झुगारुन दे . स्वतःचेच मूळस्वरुप पहा, स्वतःलाच नीट न्याहाळ. पण हा नीट न्याहाळण्याचा जो विवेक विचार आहे, ज्याला आत्मज्ञान असे म्हणतात; तो म्हणजे सर्वस्व नव्हे.

Comments

Popular posts from this blog