आत्मस्वरूप
अभिमान
एखादा माणूस येतो, त्याची व्रते, त्याचे उपवास, त्याच्या तीर्थयात्रा, तो नित्य करीत असलेल्या पूजा-अर्चा, त्याचे भजन, या सर्वांचा मोठा अभिमान तो बाळगत
असतो. मोठ्या अभिमानाने तो स्वतःला
व्रती, याज्ञीक, पूजा करणारा भक्त, कर्ममार्गी
म्हणवून घेत असतो. परंतु ज्याचा तो अभिमान धरतो आहे, ज्यांची गोष्ट तो करीत आहे; त्या सर्व गोष्टी कोणाच्या सत्तेने घडत
आहेत याचा तो विचार करीत नाही. तो स्वतःच जर
अस्तित्वात नसता तर कोण ही व्रते, पूजाअर्चा, तीर्थयात्रा, यज्ञयाग करु शकत असता? कोण नानात-हेचे कार्य, विचार, उपचारधर्म, पाळू शकत असता? या सर्वांचा आधार कोण आहे? त्या आधाराला म्हणजे स्वतःलाच तो पाहत
नाही. ज्याच्यामुळे त्याला हे सर्व
काही करता आले, त्या स्वतःलाच तो ओळखत नाही.
तो स्वतःच जर नसता तर कोण बरे या सर्व गोष्टी करु शकत असता? तो स्वतःच जर नसता तर कोण याचा अभिमान
धारण करु शकत असता? या अभिमानाला धारण करणारा तो या अभिमानापेक्षा निराळा आहे. हा
ज्ञानाचा, भक्तीचा, कर्ममार्गाचा अभिमान; हा
प्रपंचाचा, व्यवहारिक कुशलतेचा अभिमान, परमार्थाचा अभिमान, हा बुद्धीकुशलतेचा अभिमान; या अभिमानाला धारण करणारा, प्रगट करणारा आणि वेळप्रसंगी या अभिमानाला तुच्छ लेखून स्वतःच्या
स्वरुपाचे गुणगान करणारा तू वेगळाच आहे.
ज्याने हा अभिमान धारण केला आहे, ज्याने हा भावभावनांचा कल्लोळ स्वतःवर
प्रगट केला आहे, स्वतःला त्याखाली झाकून घेतले, आणि नुसताच अभिमानाचा भास आणि तो
सुद्धा स्वतःच्याच ठायी उत्पन्न केलेला आहे तो स्वतःला पाहत नाही म्हणून यांचा गुलाम
झालेला आहे. म्हणून यांच्या तावडीमध्ये गेलेला आहे. म्हणून आधी तू स्वतःचा विचार कर. या
ज्ञानाचा, विचारांचा, विकारांचा, नानात-हेच्या भक्तीभावनांचा, कर्ममार्गाचा, सर्व धर्माचा तू विचार करु नकोस. यांची
भिडमुर्वत तू ठेवू नकोस.
‘‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वां
सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः‘‘।।
सर्व धर्माधर्माचा म्हणजे त्यांना कारणीभूत असणा-या अज्ञानाचा त्याग करून, तू मला एकट्यालाच शरण ये. म्हणजे मी
तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू शोक करू
नकोस. तो पुकारतो आहे मला एकट्यालाच शरण ये. अरे, या नाना भावभावनांच्या, वृत्तींच्या, कल्पनेच्या, विचारांच्या आहारी तू जावू नको. ये! ये, माझ्याकडे ये. यांच्याकडे पाठ फिरव. यांच्याकडे वळू
नकोस. यांच्या आहारी जावू नकोस, माझ्याकडे
मुख वळव आणि माझ्यातच येऊन मिळ. माझ्यापेक्षा
तू भिन्न राहू नकोस. माझ्याशी एकरुप हो, मला
ओळख! माझ्याशी एकरुप होशील म्हणजेच मी तुला
सापडेल. म्हणजेच तू मला जाणू शकशील.
Comments
Post a Comment