आत्मस्वरूप

आवरण

     पण तुम्ही स्वतःच्याच ठिकाणी अढळ रहा. हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा की ज्ञानाची जागा अज्ञानाच्याच पंक्तीत आहे. अज्ञानाच्या शेजारीच ज्ञानाचे पान मांडलेले आहे. त्यामुळे अज्ञानाचा आणि ज्ञानाचाही निर्वाह होतो आहे. या दोघांचाही निर्वाह कल्पनेच्या पक्वांनामुळेच होत आहे. आपण ही कल्पनामय पक्वान्ने जेवायला वाढत आहे आणि ज्ञानवृत्ती त्याचा फडशा पाडीत आहे. दोघांचेही जीवन त्यावरच आधारलेले आहे. म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे एकाच पंक्तीत राहणारे असून तुम्ही त्याच्या पलिकडले आहात. तुमच्या दृष्टीने हे दोन्ही सारखेच असू द्या. ते म्हणजे तुम्ही नव्हे, तर ते सुद्धा तुमच्या ठाई निर्माण झालेले एक आवरण आहे. हे आवरण तुम्हाला झाकून बसते, ते तुम्हाला स्वतःचीच ओळख होऊ देत नाही. अज्ञान हे घट्ट आवरण आहे तर ज्ञान हे झिरझिरीत आवरण आहे,हे ओळखून यांना झुगारुन द्या. म्हणजे तुम्ही स्वतःच्या तेजाने स्वतःच प्रगट रहाल.

     अज्ञानाला जसे तुम्ही प्रकाशित करता तसेच हा ज्ञानाचा कल्लोळ तो तुमच्याच ठिकाणी उत्पन्न होतो. या ज्ञानाच्या वृत्ती ज्या तुमच्या ठाई उत्पन्न होतात त्यांनाही प्रकाशित करणारे तुम्ही आहात. या ज्ञानाने भरलेल्या वृत्ती म्हणजे तुम्ही नव्हे. मग कशासाठी करता ज्ञानाची बडबड! तुमच्या ठिकाणी काहीच नाही. उच्चतम विचार ज्यामध्ये लय पावतात, मग ते उच्चतम विचार पराभक्तीचे का असेनात; ते ज्यामध्ये लय पावतात ते तुम्ही स्वतः आहात. उच्चतम भावना मग त्या पराभक्तीच्या का असेनात, ते ज्यामध्ये लय पावतात; ते तुम्ही स्वतः आहात. उच्चतम आचार मग ते ब्रम्हनिष्ठतेचे का असेनात, ते ज्यामध्ये लय पावतात; ते तुम्ही स्वतः आहात. ते स्वतःचे स्वरुप जसेच्या तसे राहू द्या. त्यात हे दुसरे कशाला आणता? त्यात हे ज्ञान, भक्तीभाव, आचारधर्म आणू नका. कारण अखेर हे मनच असते आणि हे मनच तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व मानून राहिलेले आहात.

Comments

Popular posts from this blog