आत्मस्वरूप

कल्लोळ

     हे महासागरा, तुझ्याच पोटी या सर्व लाटा उत्पन्न होत असतात. हा सर्व लहरींचा कल्लोळ तुझ्याच स्वरुपावर विलसत असतो. तुझ्या पोटी मोठमोठ्या पर्वत शिखरांएवढ्या उत्तुंग लाटा जरी उसळल्या तरी त्यांचे उसळणे हे कायम राहणारे नाही. तर अखेर त्या तुझ्यामध्येच विलय पावत असतात. हे महासागरा, तुला सामावून घेणारा तो चिरंतन आहे, या लाटा क्षणिक उत्पन्न होतात आणि क्षणिक नाश पावतात. या लाटांना उत्पन्न करणारा आणि आपल्यात मिळवून घेणारा (विलय पावून घेणारा) तो तू स्वतःच आहेस. म्हणून या भावभावनांना, विचारांना इतकेच नव्हे तर विकारांना, कल्लोळांना तू श्रेष्ठ मानू नकोस. तर ते सर्वकाही तुझेच गुणगान निर्माण करण्यासाठी उत्पन्न झालेले आहेत. त्यातून स्वतःचे स्वरुप पहा, स्वतःचे ऐश्वर्य पहा. तू शांत आहेस, तू निश्चल आहेस. तेच तुझे वास्तविक स्वरुप आहे. तू अखंड राहणारा आहे आणि तुझी अखंडता कधीही भंग न पावणारी आहे आणि या लाटा कशा आहेत? या लाटा चंचल आहेत, या लाटा क्षणभंगूर आहेत आणि यांचे अस्तित्वही क्षणिक असे आहे. तुझ्या अस्तित्वामुळे यांचे अस्तित्व आहे, तू जर नसतास तर या लाटा कशा उत्पन्न झाल्या असत्या? यांना तुझाच आधार आहे. तुझे अस्तित्व हे अखंड अस्तित्व आहे आणि म्हणून यांच्या अस्तित्वाला तू का भीक घालतोस? यांचा गुलाम का होतोस? यांचा थयथयाट दोन क्षणांचा आहे, यांचा उन्माद अखेर तुझ्यामध्येच सामावून जाणार आहे. हे तू कां विसरतोस? हे ज्ञान, विचार, भक्ती, भावना, विकार अखेर हा केवळ तुझ्यावरचा कल्लोळ आहे. हा कल्लोळ म्हणजे तू नव्हे. यांचे अस्तित्व म्हणजे तू नव्हे! यांचे अस्तित्व अखेर ज्यामध्ये आटून जाते तो महासागर तू आहेस. यांना पोटांमध्ये सामावून घेणारा महासागर तू आहेस.

Comments

Popular posts from this blog