आत्मस्वरूप


विचार

तुझ्या ठाई जे नाना विचार उत्पन्न झालेले आहेत त्यांचा तू गुलाम आहेस. तुझ्या ठिकाणी ज्या
नानात-हेच्या कल्पना उत्पन्न झाल्या आहेत त्यांचा तू गुलाम आहेस. तुझ्या ठिकाणी जे नानात-हेचे
स्वभाव प्रगटतात त्यांचा तू गुलाम झालेला आहेस. अरे ते तुझ्याच पोटी निर्माण झालेले आहेत. त्या
सर्वांचा तू गुलाम झाला आहेस. तुझ्या भावभावना, तुझे नानात-हेचे विचार, तुझ्या नानात-हेच्या
कल्पना, तुझ्या नानात-हेच्या प्रवृत्ती आणि भीती यांचा तू गुलाम झालेला आहेस. या गुलामगिरीतून तू
केव्हा मुक्त होशील? ज्याला तू स्वातंत्र्य समजत आहे, ज्याला तू स्वतंत्रता म्हणत आहेस, ती
स्वतंत्रता नव्हे. ज्याला तू स्वतःचे व्यक्तिमत्व म्हणवून घेत आहे, तू म्हणजे त्या व्यक्तिमत्वाची एक
गुलामगिरी आहे. तू त्या व्यक्तिमत्वाचे स्वतःचे असलेले निराळेपण ओळखत नाही. तू त्या कल्पनांचा,
विचारांचा, भावभावनांचा, त्या स्वभाव वैशिष्ट्यांचा किंकर आहेस, दास आहेस, बटिक आहेस.
त्यांच्यापासून तू सुटला नाहीस, त्यांच्यापासून तू मोकळा झालेला नाहीस, तुला तुझे स्वतंत्रपण
उमगलेले नाही. तू यांच्या बंधनांनी चारी बाजूंनी बांधल्या गेलेला आहेस. या कल्पनेच्या जाळ्यामध्ये तू
गुरफटून गेलेला आहेस. तू या जाळ्याच्या बाहेर जाण्याची, मोकळा होण्याची खटपट तर करीत
नाहीच, पण उलट ज्या जाळ्यांनी तू बद्ध झालेला आहेस; त्या जाळ्यानांच तू स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व
मानत आहेस. हाच तुझा अहंपणा, हा तुझा मीपणा, हाच तुला नाचवित आहे, खेळवित आहे. तुझ्या
मानगुटीवर बसून तुझा स्वतःचा नाश करीत आहे. हे तुला उमगत नाही, पण कधीही नाश न
पावणारा तू आहेस. तू अविनाशी आहेस. तुझे अस्तित्व हे चिरंतन आहे. त्यामुळे आज जरी तू यांच्या
बंधनात अडकलेला असला तरी तुला कायमचे जखडून टाकण्याचे सामर्थ्य यांच्यात नाही. कधीतरी
यातून तू सुटतोच. कधीतरी तू मुक्त होतोच. अखेर यांना झुगारून देवून स्वतःच्या स्वातंत्र्याने तू
विलसत असतोच.पण तू स्वतःच्याच ठाई झोपलेला आहेस. तुझे सामर्थ्य तू प्रगट करत नाहीस म्हणून
या जाळ्यामध्ये तू निश्चिंतपणे झोप घेत आहेस. 

Comments

Popular posts from this blog