शब्द


तुम्ही शब्दांना अर्थाच्या मर्यादांनी बांधू नका. मग कोणताही शब्द असीम अर्थ प्रगट करण्यास समर्थ आहे, आणि तिच शब्दांची सार्थकता आहे.
     अर्थाची सीमा नसलेला शब्द सर्व भाव, भावना, विकार, विचार, भाषा यांना आपल्यात सामावतो. अर्थ सिमीत शब्द हा भाषेचा गुलाम आहे. उलट असीमार्थ शब्द हा सर्व बंधनापासून मुक्त आहे. तो सार्थ आहे. त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणजे तुमची खरी अभिव्यक्ती आहे. त्यातच तुमच्या स्वस्वरूपाचे दर्शन आहे. तुम्हीच शब्दरूप होऊन असीमतेने प्रगटा.
     ज्यावेळी तुम्ही अर्थबध्द शब्दांनी तुमचे विचार व्यक्त करता, त्यावेळी शब्दांच्या बंधनांनी जखडून टाकलेले तुमचे सीमाबध्द रूप प्रगटत असते, आणि त्यालाच तुम्ही स्वत:चे स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून मानत असता. म्हणून व्यक्तीमत्व हे नेहमी सीमीतच असते. स्वत:चे असीम, अव्यक्त स्वरूप त्यातून व्यक्त होत नाही.
     मग या सीमाबध्द शब्दांची फोलकाटे पुन्हा पुन्हा का उफणता? असीमार्थ शब्द म्हणजे तुमचे अबोलणे बोल होत. त्यातून तुमचे अव्यक्तीमत्व (आत्मस्वरूप) ओसंडत असते. 

Comments

Popular posts from this blog