आत्मस्वरूप

भारवाहू ज्ञान

उठ, अज्ञान निद्रेतून जागा हो, ‘‘उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्य वरान्निबोधत‘‘.
     जा ते तुला स्वतंत्रतेचे महान ऐश्वर्य तुझ्याच ठाई कसे आहे ते दाखवून देतील. सद्गुरुंना शरण जा. ज्याला तू ज्ञान म्हणत आहे ते ज्ञान नव्हे. वेगवेगळ्या ग्रंथांतून आणि जगातून तू जे ज्ञान मिळविलेले आहे, ते ज्ञान म्हणजे तुझी कमाई आहे. त्या कमाईच्या मागे तू लागून ती अधिक वाढावी यासाठी खटपट करुन राहिलेला आहेस. असे कितीही जरी या ज्ञानाच्या कणांना तू गोळा करत बसलास तरी ते काय कामाचे? ते नुसतेच ओझे! ते शिरावर किती दिवस तू बाळगत राहणार. तुला वाटते हे ज्ञान अधिक अधिक गोळा करील, अधिक अधिक ज्ञानसंपन्न होईल. सर्व जगामध्ये अलौकिक विव्दान म्हणून मी गाजेन, पण बाबा अरे, तू या तुझ्या डोक्यावरच्या ओझ्यात अधिकाधिक भर पाडून राहिलेला आहेस. जितके जितके हे ज्ञान वाढवशिल तितका तितका तू अलौकिक ओझेवाला म्हणून गाजशील. ज्ञान मिळविणे आणि ते जतन करुन ठेवणे ही एक हमालीच आहे. त्या ज्ञानाला वाहणारा तू एक गुलामच आहेस. ती तुझ्या डोक्यावरची ज्ञानाची पेटी, तिचा भार तुला उमगत कसा नाही


ज्ञानाच्या पेट्यावर पेट्या तू गोळा करशील आणि एक दिवस त्याखाली तू चिरडून मरशील, हे तुझ्या लक्षामध्ये कसे येत नाही? तुझ्या मेंदूच्या मंजुषेत या ज्ञानाचा अफाट साठा गोळा करुन ठेवलेला आहेस. पण याचे ओझे तुला अजूनही असह्य कसे वाटत नाही? नाना विचार गोळा करणे हीसुद्धा एक हमालीच आहे. बाबारे, ही हमाली तू किती करणार? याच्यापेक्षा तू स्वतंत्र, वेगळा असा आहेस! या गोळा केलेल्या ज्ञानमय विचारांना तू फेकून दे, दे झुगारुन, आणि स्वतंत्र हो, मोकळा हो. यांची हमाली करु नको, यातून बाहेर निघ आणि स्वतःच्या स्वतंत्रतेने राहा. तुझे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान, या भावना, हे विचार, हे स्वभाव, या नानात-हेच्या कृती, या सर्वांचा चिवडा, कडबोळे आहे. हे सर्व एकत्र गोळा केले आणि त्यामध्ये तू स्वतःला हरवून बसला. या सर्व ओझ्याखाली तू स्वतःलाच विसरून बसलास. 


हे ओझे आणि तू स्वतः एकरुपच आहोत अशी कल्पना तू करुन बसलास आणि म्हणू लागला की मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे. मी भक्त आहे, मी शास्त्री आहे. मी व्यवहारी, भावनाशील, कुटूंबवत्सल आहे. मी शहाणा आहे. मी माझ्या स्वतःच्या स्वतंत्र अशा वैशिष्ट्यांनी, स्वतंत्र अशा गुणांनी युक्त आहे. इतरांपेक्षा माझे व्यक्तिमत्व वेगळे आहे. अशात-हेची तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलची कल्पना, अशा व्यक्तिमत्वाचा तू नीट विचार कर. अरे ते व्यक्तिमत्व म्हणजे तुझा नुसता अहंकार आहे. त्या अहंकाराने, त्या मीपणाने, त्या अहंभावाने या व्यक्तिमत्वाचे सोंग घेतले आहे. हा सर्व आभास ज्याच्याविशयी भासतो आहे तो तू या सर्वांपेक्षा निराळा असा आहे.

Comments

Popular posts from this blog